उसळणाऱ्या लाटांचा खडखडाट
मंद हवेचा स्पर्श
जणू जाणीव करून देत होते
माझ्या अस्तित्वाची
ते अस्तित्व
ज्याला मी स्वतःपासून
वंचित केले होते
आणि अचानक ... अचानक
मला मी भेटले
हो .. माझ्यातली मी
निरागस तो चेहरा होता
आणि निर्मल ते हास्य
ते सोज्वळ चैतन्य
त्याच्या सुटकेबद्दल
जणू कृतार्थ होते
मी मोहक नजरेने
माझ्यातल्या मी ला अनुभवत होते
अणि तोच एक आवाज कानी आला
तो प्र्श्न होता...
स्वार्थ किती असावा ?
तू टिकून राहावीस
म्हणून तू मला डांबलेस
मला कैदेत ठेवून
तुला मनःशांती मिळाली ??
दुनियेच्या या मायाजालात
कठपुतळी बनून
काय प्राप्त केलस ??
आणि मी विचारात पडले
या प्रश्नांनी मला बेचैन केले
मी डोळे बंद करून
प्रश्नांची उत्तरे शोधू लागले
मी माझं अस्तित्व गमावलं का?
खरोखर मला आनंद मिळाला ?
स्वतःच मन मारून जगण्यात
मी काय मिळवलं ?
कारण काय ?
शर्यत.... ??
आणि कुणाशी ?
शर्यतीत धावता धावता
द्वेषभावनांना बळी पडले
मी स्वतःला विसरले
बस्स , आता प्राधान्य
माझ्यातल्या मी ला !!!
आणि मी डोळे उघडले
तोच समोरची प्रतिमा नाहीशी झाली
आणि मला मी सापडले
तो संवाद होता माझा माझ्याशी ...
- प्रियंका ढिवरे